वेरूळ

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलो मीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरुळ आहे.

इतिहास

वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

रचना

वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते.

हिंदू लेणी

वेरूळच्या हिंदू लेण्यांची शैली इतर लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पेच आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू कून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. असे शिल्प किंवा बांधकाम करण्यासाठी शिल्पकार/कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.
कैलास मंदिर

वेरुळचे कैलास मंदिर
वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान आणि निर्मितीमागची असामान्य शिल्पकला ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत!
घृष्णेश्वर मंदिर
वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील १२ ज्योतीर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.

बौद्ध लेणी

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्त्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.
यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तेथे स्तूप आहे. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड असा कोरलेला आहे की असे वाटावे जणू लाकडी वासेच. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.

जैन लेणी

वेरूळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

लेण्यांना भेट देण्याकरता उपलब्ध मार्ग

रस्ता मार्गे

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.).

लोहमार्गे (रेल्वे)

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.
चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरुन रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे.

विमान मार्गे

औरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपुर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ

सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.
Category: 0 comments

No comments:

Post a Comment